चिर्ले-दास्तान, जासई-गव्हाण रस्त्याची दुरवस्था

| उरण । वार्ताहर ।

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असणार्‍या दास्तान फाटा ते चिर्ले, जासई ते गव्हाण मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची रेलचेल असते. त्यामुळे सदर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामूळे अपघात होण्याची संभावना निर्माण झाली आहे.

जेएनपीए बंदराच्या अनुषंगाने आयात-निर्यातीसाठी तालुक्यातील विविध गावांच्या हद्दीत मोठमोठी गोदामे, एमटी यार्ड साकारण्यात आले आहेत. त्यातील बहुतांशी गोदामे ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्याला लागून वसविण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारच्या माध्यमातून बनविण्यात आलेले रस्ते अवजड वाहतुनीच्या अनुषंगाने नसल्याने आणि रस्त्याचा दर्जा नसल्याने गोदामात येणार्‍या मालाचे अवजड कंटेनर ट्रेलर वाहतुकीमुळेच रस्ताची दुरवस्था होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ठेकेदारामार्फत चिर्ले येथील रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. अतिवृष्टी आणि अवजड वाहतुकीमुळे रस्ताच शिल्लक राहिला नाही तर धोकादायक बनला असुन आजही हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. चिर्ले ते दास्तान या दरम्यान रेल्वेच्या पुलाचे काम सुरू असल्याने आणि अवजड वाहतुकीमुळे या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ठेकदारामार्फत पर्यायी रस्ता प्रवाशांच्या सेवेसाठी बनवायचा असताना रस्त्या बनविण्यात आलेला नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

Exit mobile version