हुतात्म्यांच्या स्मारकांची दुरवस्था

। चिरनेर । वार्ताहर ।

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी देशात जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्या हुतात्म्यांच्या स्मारकांकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सत्याग्रहात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची स्मारके त्यांच्या मूळ गावी उभारली आहेत. मात्र, या स्मारकांची पडझड झाली असून, त्याचा नागरिकांकडून गैरवापर होत आहे. या स्मारकांमध्ये अक्षरशः उकिरडे झाले असून, ती अडगळीत पडली आहेत. असे असताना प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

स्वातंत्र्यसंग्रामातील 25 सप्टेंबर 1930 सली झालेला जंगल सत्याग्रहातील आंदोलकांवर ब्रिटिश सरकारने बेछूट गोळीबार केला होता. या गोळीबारात धाकू गवत्या पोपेरकर, नाग्या महादू कातकरी, रघुनाथ मोरेश्‍वर न्हावी (कोप्रोली) (मोठी जुई), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), परशुराम रामा पाटील (पणदिवे), हसूराम बुधाजी घरत (खोपटे), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या आठ सत्याग्रहांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. यामध्ये 38 आंदोलन जखमी झाले होते.

या हुतात्म्यांचे सदैव स्मरण राहावे आणि त्यांचा इतिहास भावी पिढीला ज्ञात व्हावा या हेतूने शासनाने उरण तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी स्मारके ही उभारले आहेत. मात्र, शासकीय यंत्रणाच्या अक्षम्य अनास्थेमुळे चिरनेर, कोपटा, कोप्रोली, पाणदिवे, धाकटी जुई, मोठी जुई, दिघोडे येथील स्मारके गुरेढोरे, भटक्या कुत्र्यांसाठी वास्तव्याची ठिकाणी बनली आहेत. यातील काही स्मारके कपडे वाळत घालण्यासाठी आणि मासळी, धान्य वाळवण्यासाठी उपयोगात आणली जात आहेत. एका स्मारकात तर अज्ञात व्यक्तीने संसारही थाटला आहे. काही स्मारकांचा वाहने पार्किंग करण्यासाठी उपयोग केला जात आहे. मात्र, शासनाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे हुतात्मक स्मारके उकिरडे बनली आहेत. स्वतंत्र्यसंग्रामातील हुतात्म्यांबाबत संवेदनशीलता, आत्मीयता हरविली असून, हुतात्मा स्मारकांची अशी अवस्था दयनीय झाली असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.

Exit mobile version