मोरा सागरी पोलीस इमारतीची दूरवस्था

उद्घाटना अगोदरच इमारत भग्नावस्थेत

| उरण | वार्ताहर |

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे 85 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नवीमुंबई पोलीस आयुक्त हद्दीतील मोरा सागरी पोलीस ठाण्याची नवी इमारत उध्दघाटना अगोदरच भंगारात निघाली असून सध्या या इमारतीला झाडा झुडपांचा विळखा पडला आहे. त्यामुळे शासनाकडून खर्च करण्यात आलेला 85 लाखांचा निधी वाया जातो कि काय असा प्रश्न उरणकरांना पडला आहे.

सागरी किनारपट्टी भागातून होणारे दहशतवादी हल्ल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि देशातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शासनाने किणारपट्टी वरील सागरी पोलीस ठाण्यांना विशेष महत्त्व प्राप्त करून दिले आहे. त्या अनुषंगाने मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मोरा, करंजा बंदर आणि घारापुरी परिसरावर नजर ठेवण्यासाठी शासनाने नवीमुंबई पोलीस आयुक्तांच्या हद्दीत नव्याने मोरा सागरी पोलीस ठाण्याची निर्मिती केली. सदर पोलीस ठाण्यासाठी सुसज्ज इमारत असावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उरण शहरातील पेन्शन पार्क येथील भूखंडावर शासनाकडून प्राप्त झालेल्या 85 लाख निधीतून सुसज्ज इमारतीचे बांधकाम 2018 ते 2020 या वर्षात हाती घेतले आहे.

सदर पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या छताला पावसाळ्यात गळती लागली आहे. त्यात शहरात उध्दभवणाऱ्या पुर परिस्थितीचे पाणी सदर इमारतीच्या तळमजल्यावर साचून राहते, एकंदरीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे उध्दघाटना अगोदरच सदर इमारत भग्नावस्थेत पडून राहिली आहे. तरी राज्यातील जनतेचा पैसा वाया जातो की काय अशी चर्चा सध्या उरणात रंगू लागली आहे.

उरण येथील मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचे काम हे रेंगाळत पडले आहे. सदर बांधकाम पुर्ण करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. सदर इमारतीचे काम पूर्ण व्हावे, अशी पोलीस यंत्रणेची मागणी आहे.

दिपक इंगोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मोरा सागरी पोलीस ठाणे

मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे काम हे निधी अभावी रेंगाळत पडलेले आहे. शासनाकडून उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून वरिष्ठ स्तरावर मागणी करण्यात आली आहे. निधी उपलब्ध झाला तर उर्वरित काम लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे.

नरेश पवार, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, उरण
Exit mobile version