मठाच्या स्मशानभूमीतील शेडची दुरावस्था

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धनमधील मठाच्या स्मशानभूमीतील शेडची दुरावस्था झाली असून ही शेड पूर्णपणे मोडकळीस आली आहे. शेडचे छप्पर खाली आले असून त्या ठिकाणी मोठमोठी झाडे वाढलेली पाहायला मिळतात. मागील दोन वर्षांपासून या शेडची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शहरातील याच मठाच्या स्मशानभूमीमध्ये श्रीवर्धन नगरपरिषदेने गॅस शव दाहिनी बसविली आहे. मात्र अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी बसण्याची सोय नसल्यामुळे अंत्यविधी होईपर्यंत उभे राहावे लागत आहे.

यामध्ये विशेष करून काही आजारी व ज्येष्ठ नागरिक यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. नुकतेच श्रीवर्धन समुद्रकिनारी असलेल्या धुप प्रतिबंधक बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात आली व सुशोभीकरण करण्यात आले. सदरचे काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराने अनेक दिवस आपले सिमेंट या शेडमध्ये ठेवले होते. त्या ठेकेदाराकडून सदरची शेड दुरुस्त करून घेता येणे शक्य होते. परंतु नगर परिषदेने तसेही केले नाही.

या स्मशानभूमीमध्ये श्रीवर्धनला लागूनच असलेल्या आराठी ग्रामपंचायत हद्दीतील व मेटकर्णी परिसरातील नागरिक देखील अंत्यविधी करण्यासाठी येत असतात. शहरातील सर्वात जास्त अंत्यविधी याच ठिकाणी होतात. तरी श्रीवर्धन नगरपरिषदेने सदर शेडची तातडीने दुरुस्ती करावी. अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Exit mobile version