ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी ग्रामस्थांची धडपड
। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्याहुन वरवठणे, रोह्याकडे जाण्यासाठी महत्वाचा असलेल्या अंबा नदीवरील शिवकालीन पुलाच्या कठड्यांचे गुरुवारी (दि.26) आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शिवकालीन पुलाला अखेरची घरघर लागली असून हा ऐतिहासिक ठेवा जपून ठेवण्यासाठी येथील ग्रामस्थांची धडपड चालू आहे. याठिकाणी कोणताही संभाव्य अपघात घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने तुटलेल्या कठड्याचे बांधकाम करून योग्य ती उपाययोजना करावी. तसेच, नागोठणे व वरवठणे गावांना जोडणारा नवीन पुलाचा प्रस्ताव शासनाने तयार करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
रायगड जिल्ह्यातील नागोठणे-वरवठणे गावांना जोडणारा अंबा नदीवरील शिवकालीन पूल हा सुमारे 450 ते 500 वर्षापूर्वीचा असून याच पुलावरून गेले अनेक वर्षापासून एसटी व इतर अवजड वाहतूक सुरू होती. भारत सरकारचा उपक्रम असलेला आयपीसील (रिलायन्स) कंपनीच्या उभारणीच्या काळात नगोठण्यात अंबा नदीवर पर्यायी पुल उभारल्यानंतर या ऐतिहासिक पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. या ऐतिहासिक पुलाला अंबा नदीला दरवर्षी येणाऱ्या पुरांसह 1989, 2005 साली व त्यापूर्वी आलेल्या अनेक महापुराचेही फटके बसले आहेत. त्यामुळे या पुलाची खुप वाईट अवस्था झाली आहे. असे असतांनाही सार्वजनिक बांधकाम खात्याचे रोहा विभाग पुलाच्या डागडुजीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने अखेर यावर्षीच्या पुरात पुलाचा वरवठणे गावाकडे जाताना उजव्या बाजूकडील कठडा दोन ठिकाणी उध्वस्त झाला आहे. हा शिवकालीन पूल आता मोडकळीस आला असून भविष्यात अचानक कोसळला तर जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आतातरी शासनाचे डोळे उघडतील का, तसेच सार्वजनिक बांधकाम खाते आपले उदासीन धोरण सोडून या पुलाच्या डागडुजीकडे गांभीर्याने लक्ष देईल का, असा प्रश्न येथील नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, आपला हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी काही वर्षांपूर्वी वरवठणे गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन या पुलावर व पुलाखाली दोन्ही बाजूला वाढलेले गवत, वाढलेली झाडेझुडपे तोडून व पुलावरील अनावश्यक घाण काढून पुलाची साफसफाई केली होती. तसेच, पुलाला धोका पोहचू नये यासाठी छोट्या वाहनांसाठी देखील हा पूल ग्रामस्थांनी बंद केला होता. आज संबधित अधिकारी व शासनकर्ते यांच्या नाकर्तेपणामुळे पुलाची दयनिय अवस्था झालेली आहे. नागरिक या पुलावरून रहदारी करत असताना जर हा पूल खचून पडला तर त्यावेळी काय घडेल व दुर्भाग्याने असे घडले तर त्याची सर्व जबाबदारी बांधकाम विभागाची असेल, असेही नागरिकांतून बोलले जात आहे.