दिलीप भोईर यांनी माकडचाळे थांबवावे

शिंदे गट-भाजपमध्ये नारळफोडीचे राजकारण

। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील बेलकडे-रोहा मार्गाचे काम गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरु झाले आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना हा रस्ता मंजूर झाला होता. त्याबाबत प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली असताना भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भोईर यांनी केवळ श्रेयासाठी नारळ फोडून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. राज्यात शिंदे गट आणि भाजप एकत्रित असताना ही बाब शिंदे गटातील लोकप्रतिनिधींना समजताच त्यांनीही श्रेयासाठी पुन्हा नारळ फोडत दिलीप भोईर यांनी माकडचाळे थांबवावे, अशी टीका केली.

सतत दोन दिवस या मार्गावर नारळ फुटत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये जोरदार व्हॉट्सअ‍ॅप मेसेज व्हायरल होत आहे. याशिवाय राज्यात एकत्रित असले तरी अलिबाग तालुक्यातील शिंदे गट-भाजप या दोघांमधील नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.शिंदे गटाचे, म्हणजेच मित्रपक्षाचे आमदार सत्तेत असताना भाजपच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांनी आमदारांना डावलून मोठ्या दिमाखात रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयोग केला.

ही बाब शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांना चांगलीच झोंबली. त्यामुळे संतापलेल्या शिंदे गट पदाधिकार्‍यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची चांगलीच शाळा घेतली. बेलकडे-रोहा या मार्गासाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी सुरु असून, या वादात नक्की कोणाचे पारडे जड, हे येत्या काळात समजेल, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले

Exit mobile version