दिनेश बटावले हत्याप्रकरणी स्वराज्य प्रतिष्ठानच्या भास्कर कारेवर गुन्हा

। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील शेणाटे येथे पूर्व वैमानस्यातून झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या दिनेश बटावले यांचा मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.मात्र हल्ला करणार्‍या चार आरोपींपैकी रुपेश बटावले व गणेश बटावले या दोनच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तर या प्रकरणातील राकेश बटावले व स्वराज्य प्रतिष्ठान चा संस्थापक व राष्ट्रवादीचा कार्यकर्ता भास्कर कारे हे दोन आरोपी मोकाट असल्याने शेणाटे येथील ग्रामस्थांनी दिनेश बटावले यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न घेऊन जाता थेट तळा पोलीस ठाण्यासमोरील चंडिका देवी चौकात ठेवला. जोपर्यंत राकेश बटावले व भास्कर कारे या आरोपींवर गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचा आक्रमक पवित्रा शेणाटे ग्रामस्थांनी घेत चंडिका देवी चौकातच लहान मुलाबाळांसह शेणाटे ग्रामस्थ व मुंबईकर ठाण मांडून बसले.

शेवटी माणगाव पोलीस निरीक्षक,गोरेगाव पोलीस निरीक्षक व तळा पोलीस निरीक्षक यांनी या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केल्याची प्रत दिल्यानंतर रात्री 2 नंतर ग्रामस्थ दिनेश बटावले यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.

Exit mobile version