विमानतळ आस्थापनेवर कर आकारणीचे निर्देश

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतींनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आस्थापनेवर कर आकारणी करण्याचे निर्देश पनवेल पंचायत समितीने दिले आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या विविध व्यावसायिक मालमत्ता, सेवा सुविधा आणि संबंधित आस्थापनांवर नियमानुसार कर आकारणी करण्याबाबत ग्रामपंचायतींना निर्देश देण्यात आले आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 25 डिसेंबरपासून सुरू झाले आहे. हे विमानतळ सुमारे 1 हजार 160 हेक्टर क्षेत्रात पसरले आहे. ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने पंचायतीने सर्व आस्थापनांवर कर आकारणी करणे आवश्यक आहे. तरघर, उलवा, पारगाव, ओवळे, वडघर, वाघिवली या ग्रामपंचायत हद्दीत विमानतळ आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ही वाणिज्यिक, औद्योगिक आस्थापना आहे. या आस्थापनेवर ग्रामपंचायतीकडून कर आकारणी करणे क्रमप्राप्त आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आस्थापनेवर नियमानुसार कर आकारणी करावी, असे निर्देश पनवेल पंचायत समिती यांच्याकडून ग्रामपंचायत यांना देण्यात आलेले आहेत.

विमानतळामुळे परिसरातील आर्थिक व्यवहार वाढत असून, ग्रामपंचायतींच्या उत्पन्नातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महसुलात वाढ होऊन नागरी सुविधा आणि विकासकामांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे. विमानतळाच्या विस्तारासह परिसरातील विकास प्रकल्पांना गती मिळत असल्याने स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायतींची जबाबदारीही वाढली आहे. उरण जेएनपीए प्रशासनाकडून संबंधित ग्रामपंचायती कर वसूल करतात.

Exit mobile version