अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश
| मुंबई | प्रतिनिधी |
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाच्या सहायक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील रस्ते स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नाले स्वच्छता, बस थांबे आदी ठिकाणच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देऊन परिसर स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्या आहेत.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी (दि.20) पश्चिम उपनगरांतील एच पूर्व, पी उत्तर आणि पी दक्षिण या विभागांमधील विविध ठिकाणांना आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विभागांमधील परिसर स्वच्छता आणि नाले स्वच्छतेच्या कामांचा पाहणी केली. त्यानंतर त्यांनी एच पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त कुंदन वळवी आणि पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त अनिरूद्ध कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनी संवाद साधला. या दूरध्वनी संवादादरम्यान त्यांनी संबंधित सहाय्यक आयुक्त यांना विविध बाबींच्या अनुषंगाने निर्देश दिले आहेत.
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरु आहेत. कंत्राटदाराने काढलेला ओला गाळ 48 तासानंतरच त्याचे वहन होत आहे की नाही, याकडेही संबंधित अभियंत्यांनी प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे. तसेच सहायक आयुक्तांनी संबंधित अभियंत्यांकडून या सर्व कामाचा दररोज आढावा घ्यावा, अशा सूचनाही डॉ. शर्मा यांनी आकस्मिक पाहणीनंतर संबंधित सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत.
पी दक्षिण विभागातील दाजीवाडी भाजी मंडई, राणीसती मार्ग मंडी परिसरातील स्वच्छता कामांचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच तिनही विभागातील उड्डाणपुलांखालील आणि परिसरातील कचरा हटवून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रभावी कार्यवाही करावी, असे निर्देशही शर्मा यांनी आकस्मिक पाहणीनंतर दिले आहेत.






