| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला37.5 वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकीर्दीनंतर शनिवारी सेवानिवृत्त झाल्या. मुंबईतील नायगाव पोलीस मैदानावर आयोजित एका सोहळ्यात त्यांना निवृत्तीनिमित्त गार्ड ऑफ ऑनर देऊन मानवंदना देण्यात आली.
1988च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या शुक्ला यांनी आपल्या कार्यकाळात राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखल्याचे समाधान व्यक्त केले. रश्मी शुक्ला यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदाची धुरा आता सदानंद दाते यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना रश्मी शुक्ला यांनी सर्वांचे आभार मानले. गेली दोन वर्षे महाराष्ट्र पोलिसांचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी मोठा बहुमान आहे. या काळात राज्यातील सण-उत्सव शांततेत पार पडले आणि निवडणुकाही विनाअडथळा पार पडल्या. विशेषतः गडचिरोली आणि गोंदियातील नक्षलग्रस्त भागांत झालेली सुधारणा आणि नक्षलवाद्यांच्या संख्येत झालेली घट, हे संपूर्ण पोलीस दलाचे यश आहे, असे त्या म्हणाल्या.




