| मुंबई | प्रतिनिधी |
वांद्रे येथे राहणाऱ्या 40 वर्षीय अपंग महिलेने राहत्या इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. बुधवारी (दि.16) दुपारी वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीत ही घटना घडली. शीतल पवार असे या मृत महिलेचे नाव आहे. तिने आत्महत्या का केली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीत शीतल पवार (40) या पती सतीश पवार (45) यांच्यासह 16 व्या मजल्यावरील सदनिकेत रहात होत्या. शीतल या अपंग होत्या. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांनी अचानक 16 व्या मजल्यावरून उडी मारली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत शीतल पवार यांचे पती सतीश पवार यावेळी घरातच होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी कुठल्याही प्रकारची चिठ्ठी लिहिलेली नाही. शीतल या चालू शकत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी आत्महत्या कशी केली याच्या सर्व शक्यता खेरवाडी पोलीस तपासत आहेत. याप्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






