तिरंदाजीत अतानूकडूनही अपेक्षाभंग

| टोक्यो | वृत्तसंस्था |
टोक्यो ऑलिम्पिकमधील तिरंदाजी क्रीडाप्रकारात भारताचे अभियान पदकाविनाच संपुष्टात आले. शनिवारी पुरुषांच्या विभागातील उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या अतानू दासला पराभव पत्करावा लागला.

अतानूला पुरुषांच्या सांघिक प्रकारात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. याशिवाय अन्य सर्व भारतीय तिरंदाजांनी गाशा गुंडाळल्यामुळे एकेरीत अतानूवरच पदकाच्या आशा टिकून होत्या. अतानूने माजी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जिन हेकवर सरशी साधून उपउपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्‍चित केले होते. पण, जपानच्या ताकाहारू फुरुकावाने अतानूला 6-4 (27-25, 28-28, 27-28, 28-28, 27-26) असे पराभूत केले. अतानूने संपूर्ण सामन्यात चार वेळा 10 गुणांवर अचूक निशाणा साधला. मात्र निर्णायक अखेरच्या सेटमध्ये अतानूने एकदा आठ गुणांवर निशाणा साधला. हीच चूक त्याला महागात पडली. भारताची अव्वल महिला तिरंदाज दीपिका कुमारीला शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

Exit mobile version