पात्रता फेरीत सुमार कामगिरी
| बिशकेक | वृत्तसंस्था |
भारताच्या कुस्तीगिरांनी ग्रीको रोमन प्रकारात निराशाजनक कामगिरी केली. येथे सुरू असलेल्या आशियाई पात्रता फेरीत भारताच्या एकाही कुस्तीपटूला पॅरिस ऑलिंपिकची पात्रता मिळवता आली नाही.
ग्रीको रोमन प्रकारात सुनील वगळता एकाही भारतीय कुस्तीपटूला पहिल्या फेरीचा अडथळा ओलांडता आला नाही. सुनीलने 87 किलो वजनी गटात जपानच्या सोह साकाबे याच्यावर 5-1 असा विजय मिळवला; पण उपांत्यपूर्व फेरीत त्याला उझबेकिस्तानच्या जालगासबे बर्डिमुरातोव याच्याकडून 4-2 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पात्रता मिळवण्याच्या त्याच्या आशांना सुरुंग लागला.
उझबेकिस्तानच्या अबरोर अताबायेव याच्याकडून आशू याला 67 किलो वजनी गटात पराभव पत्करावा लागला. तसेच सुमीत (60 किलो वजनी गट), विकास (77 किलो वजनी गट), नीतेश (97 किलो वजनी गट) व नवीन (130 किलो वजनी गट) या भारतीय कुस्तीपटूंना पहिल्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. याआधी 2016मधील ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंनी ग्रीको रोमन प्रकारात पात्रता मिळवली होती. रवींदर खत्री व हरदीप सिंग यांनी रिओ ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.
जागतिक स्पर्धेसाठी निवड चाचणी आशियाई पात्रता फेरीतील सुमार कामगिरीमुळे भारतीय कुस्ती संघटनेकडून जागतिक ऑलिंपिक पात्रता फेरीसाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे. तुर्की येथे नऊ मेपासून पॅरिस ऑलिंपिकसाठीच्या अखेरच्या पात्रता फेरीला सुरुवात होणार आहे. त्याआधी एप्रिलअखेरच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवड चाचणीचे आयोजन करण्यात येण्याची शक्यता आहे. महिला विभागात 62 व 68 किलो वजनी गटांत निवड चाचणी होणार असून फ्रीस्टाईल व ग्रीको रोमन या दोन प्रकारांत प्रत्येकी सहा गटांत निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
फक्त चार महिला पात्र पॅरिस ऑलिंपिकसाठी भारताकडून फक्त चारच कुस्तीपटूंनी कोटा मिळवला आहे. या चारही खेळाडू महिला आहेत, हे विशेष. विनेश फोगाट, अंतिम पंघाल, अंशू मलिक व रितिका ही त्यांची नावे. 14 विविध वजनी गटांसाठी भारतीयांकडून आता प्रयत्न करण्यात येणार आहेत.
वजनी गट बदलण्याचा निर्णय माझ्यासाठी आनंददायी नव्हता. पॅरिस ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागली. आता पॅरिस ऑलिंपिक सुरू होईपर्यंत मला वजनावर नियंत्रण राखायचे आहे. मी 50 किंवा 53 कोणत्या वजनी गटात सहभागी होईन हे आगामी निवड चाचणीमध्ये ठरेल. मात्र, मी 50 किलो वजनी गटात देशाला ऑलिंपिक कोटा मिळवून दिला, याचा अभिमान आहे.
विनेश फोगाट, भारतीय महिला कुस्तीपटू