फक्त 21 जणांनाच प्रातिनिधिक लाभाचे वाटप
| रायगड | खास प्रतिनिधी |
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानामार्फत पीएम जनमन योजनेंतर्गत 21 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक लाभाचे वाटप केंद्रीय मंत्री राणे यांच्या हस्ते सोमवारी अलिबाग येथे करण्यात आले. यातील काही लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. नजीकच्या कालावधीत त्यांनाही लाभाचे वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वार या कार्यक्रमाला जोडले गेले होते. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या 1 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला. तसेच, पीएम-जनमनच्या लाभार्थ्यांशी संवाद मोदी यांनी साधला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासन समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्याबरोबरच देश आत्मनिर्भर करण्यासाठी विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात येत असल्याचे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर आमदार रवींद्र पाटील, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, प्रकल्प अधिकारी पेण शशिकला अहिरराव, नोडल अधिकारी मुकेश यादव उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री राणे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांनी मुख्य प्रवाहात सामील करुन घेण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरु आहे. गेल्या 9 वर्षात या समाजासाठी 54 योजना राबविण्यात आल्या. समाजातील सर्व घटकांच्या आर्थिक, सामाजिक विकासासाठी वेगवेगळ्या पातळीवर केंद्र शासनामार्फत विशेष प्रयत्न सुरु आहेत. प्रत्येक घटकाला न्याय देण्याबरोबरच देशाचा सर्वांगीण विकास करण्यावर प्रधानमंत्री यांचे विशेष लक्ष असल्याचेही राणे यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यात पीएम जनमन अभियानांतर्गत 1 हजार 896 पक्क्या घरांना मान्यता, 1 हजार 755 घरांना नळपाणी पुरवठा योजनेस मान्यता, 1 हजार 974 घरांपर्यंत वीजपुरवठा, 15 वाड्यांमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांना मंजुरी, कातकरी विद्यार्थ्यांकरिता 3 वसतिगृहांना, कातकरीवाड्यांमध्ये 20 अंगणवाडी केंद्रांना मंजुरी अंतिम टप्यात, सुधागड तालुक्यातील कातकरी वाड्यांतील लोकांकरिता 15 मोबाईल मेडिकल युनिट तसेच 17 बहुउद्देशीय केंद्रांना व 3 वनधन विकास केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
तसेच, आरोग्य विभागामार्फत 58 हजार 248 कातकरी लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप, 24 हजार 920 कातकरी लाभार्थ्यांचे जनधन खाते,267 कातकरी लाभार्थ्यांना रेशन कार्ड, 646 कातकरी लाभार्थ्यांना पीएम किसान निधी, 578 नवीन आधार कार्ड, 6 हजार 537 जातीचे दाखले वाटप करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही काही लाभार्थ्यांच्या पदरात लाभ पडलेला नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. लवकरच उर्वरित लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास अधिकारी शशिकला आहिरराव यांनी कृषीवलशी बोलताना दिली.
रायगड जिल्ह्यात एकूण 596 भागांमध्ये 1 हजार 14 कातकरी वाड्या असून, 1 लाख 81 हजार 973 इतकी लोकसंख्या आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण कार्यालयामार्फत 1 हजार 14 वाड्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले. या लाभार्थ्यांना पक्की घरे, घरांचे विद्युतीकरण, सामुदायिक तसेच नळाद्वारे पाणी पुरवठा, व्यावसायिक प्रशिक्षण तसेच वेगवेगळ्या दाखल्यांचे वाटप सर्व शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून 360 मेळावे घेऊन करण्यात आले आहे.