। महाड । वार्ताहर ।
महाड तहसीलदार शितोळे साहेब यांच्या मार्गर्शनाखाली रायगड जिल्हा परिषद शाळा कुर्ले येथे आपदा मित्र सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. आपत्तीचे प्रकार आणि आपत्ती व्यवस्थापनाचे तीन स्तर, आपत्ती काळात घ्यावयाची काळजी या विषयावर सुरेश पाटील यांनी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाच्या दुसर्या सत्रात आपदा सखी प्रणाली मनवे आणि गुड्डी निर्मल यांनी लाईफ जॅकेट कसे परिधान करायचे तर, आपदा मित्र धिरज निर्मल यांनी परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून जीवन संरक्षक साहित्य कसे तयार करायचे, बॉटल लाइफ जॅकेट प्लास्टिक कॅनपासून तयार होणारे संरक्षक साहित्य तयार करून दाखविले आणि वापराबाबत प्रात्यक्षिक करून घेतले. आपदा मित्र संतोष मोरे आणि किरण शिरगावकर यांनी कळशीपासून तयार होणारे पॉट लाईफ जॅकेट तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले त्यानंतर दुखापतीच्या वेळी करण्यात येणार्या वेगवेगळ्या प्रकारच्या बँडेजचे प्रकार आणि उपलब्ध साहित्याचा वापर करून स्टेचर तयार करण्यात आले. यात विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर जखमी झालेल्या व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी स्टेचरचा वापर कसा करायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. शेवटच्या टप्प्यात संतोष मोरे यांनी पाण्यात बुडालेल्या व्यक्तीला पाण्याबाहेर कसे काढायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले आणि विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. सदर शिबिरात 45 विद्यार्थी, 4 शिक्षक, 5 व्यवस्थापन समिती सदस्य, 1 लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.