माजी आ. पंडित पाटील यांची प्रमुख उपस्थिती
| पेझारी | वार्ताहर |
लोकनेते ॲड.दत्ता पाटील यांच्या जयंतीनिमित्त कोकण एजुकेशन सोसायटीचे लक्ष्मी-शालिनी महिला महाविद्यालय पेझारी ता.अलिबाग जि.रायगड व नागरी संरक्षण दल उरण-रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन (दि. 4) को.ए.सो.लक्ष्मी-शालिनी महिला महाविद्यालय पेझारी येथील सुलभा काकू सभागृहात माजी आ. पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी लक्ष्मी-शालिनी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता चित्रकोटी यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सोमवार (दि.4) ते (दि.9) मार्चपर्यत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा सर्वांसाठी खुली असणार आहे. या कालावधीत आधुनिक युद्धतंत्र व देशाचे संरक्षण, नागरी संरक्षण, नागरी संरक्षण संघटना व सेवा, हवाई हल्ला इशारा व प्रणाली, नियंत्रण केंद्र उपनियंत्रण केंद्र कामकाज व भोंगे कार्यप्रणाली पद्धत, प्रकाश बंदीचे नियम सांगण्यात आले. मंगळवारी (दि.5) आगीची तत्वे, गृह अग्निशमन पथक संघटन व कार्य, रिकीब पंप रचना व कार्य, तीव्र स्फोटक बॉम्ब प्रकार परिणाम व संरक्षणात्मक उपाय योजना, ज्वालाग्रही बॉम्ब प्रकार परिणाम व संरक्षणात्मक उपाय योजना, रासायनिक अग्नीशामक यांचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. बुधवारी (दि.6) विमोचन सेवा संघटना परिचय, आपत्कालीन जखमींना वाहून नेण्याची पद्धती, दोरांचे प्रकार व गाठी, प्रथमोपचार तत्वे व प्रथमोपचार साहित्य,जखम रक्तस्त्राव व उपचार, त्रिकोणी बँडेज आदीचे प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नागरी संरक्षण दल उरण-रायगड येथील सहाय्यक उपनियंत्रक मनोहर म्हात्रे व ना.ना. पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील, महिला महाविद्यालय पेझारी प्राचार्या डॉ. संगीता चित्रकोटी, कुर्डुस ग्रामपंचायत माजी सरपंच संदीप पाटील, मॉर्निंग वॉक ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे प्रा. महेश बिराडे प्रा. दिलीप सोनवणे, प्रा.संतोष बिरारे, उल्हास कुवळेकर अनिल पाटील, संदीप पाटील, आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे संयोजक प्रा.डॉ.अनिल बांगर महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संगीता चित्रकोटी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.महेश बिराडे यांनी केले. तर आभार प्रा.दिलीप सोनवणे यांनी केले.