नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरीत
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात गेले दोन-तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहेत. आयुक्त गणेश देशमुख यांच्या निर्देशानूसार आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत अग्निशमन दल, प्रभाग समितीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी रस्त्यावर पडलेली झाडे काढण्यात आली आहेत. जवळपास 80 हुन अधिक ठिकाणी पंप बसवून व यंत्रणेच्या सहाय्याने उपाययोजना केल्यामुळे अद्याप मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याच्या समस्या निर्माण झाल्या नाहीत.
तसेच गाढी नदी काठाला लागून असलेले पटेल मोहल्ला, भारत नगर झोपटपट्टी, कोळीवाडा गाढी नदी पुलावर सुरक्षिततेसाठी पालिका कर्मचारी तैनात केले आहेत. महापालिका हद्दीतील पटेल मोहल्ला, भारत नगर झोपटपट्टी, मरिन केडमी येथील गाढी नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झाल्याने येथील नागरिकांना कोळेश्वर विद्यामंदिर आणि उर्दु शाळेमध्ये सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. यामध्ये कोळेश्वर विद्यामंदिर येथे सुमारे 120 व उर्दु शाळेमध्ये सुमारे 110 नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पहाणी केली व त्यांच्या जेवणाची, झोपण्याची योग्य सोय करण्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
सिडकोकडून विविध नोडचे हस्तांतरण झाल्यानंतर पनवेल महानगरपालिकेचा हा पहिला पावसाळा असून कळंबोली नोडमध्ये यावर्षी महापालिकेने केलेल्या नियोजनामुळे यावर्षी पाणी भरले नाही. नागरिकांनी याबाबत पालिकेचे आभार मानले आहेत. प्रभाग सात रोडपाली विभागात पावसाळी पाणी साचाणाऱ्या ठिकाणी सेक्टर 10-ई आंबेडकर भवनालगत असलेल्या नाल्याच्या आतील जेसीबी मार्फत व कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने गाळ काढून पाण्याचा निचरा करून डेंजर झोनची पट्टी लावण्यात आली. यावेळी पाहणी करतेवेळी प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे साहेब, आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे साहेब स्वनिरीक्षक हरेश कांबळे व कर्मचारी उपस्थित होते. रोडपालीमध्ये सेक्टर 20 मध्ये गिरिराज टॉवर येथे गटारीमध्ये अडकलेला गाळ साफ करून पाण्याचा निचरा करण्यात आला. तसेच, रस्त्यावर पडलेले झाड उचलून बाजूला करण्यात आले आहे.
कळंबोलीमधील केलई महाविद्यालयाजवळील नाल्यातील जाळीमधील अडकलेला गाळ काढून पाण्याच्या प्रवाहाला वाट करून देण्यात आली. खांदा कॉलनी सिग्नल जवळ पडलेले झाड काढून घेऊन रस्ता मोकळा करण्यात आला. पडघे येथे पडलेले झाड रस्त्यातुन बाजुला करून वाहतुक सुरळीत करण्यात आली. खारघर नोड कोपरा ब्रिज येथे पाण्याची पातळी लागून असलेले ब्रिजला अडकलेले झाड व कचरा सफाई कामगारांमार्फत काढण्यात आला. तसेच, कोपरा ब्रीज येथील पाण्याची पातळी वाढली असल्याकारणाने येथील वाहतुक काही काळासाठी थांबविण्यात आली आहे. कळंबोली नोडमध्ये धन्वंतरी हॉस्पिटल जवळ येथील जेसीबीद्वारे पाण्याचा निचरा करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, स्वच्छता निरीक्षक महेंद्र भोईर, अजय ठाकूर व स्वच्छता दूत उपस्थित होते.