महावितरणच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

चौलमळाकरांकडून कर्मचार्‍यांचे कौतुक

| चौल | प्रतिनिधी |

रात्रीच्या अंधारात प्रवाहित विद्युत तारा तुटून लोंबकळत होत्या, त्यामुळे रस्त्यावरुन जाणार्‍या लोकांच्या जीवाशी धोका निर्माण झाला होता. परंतु, महातिवरणच्या कर्मचार्‍यांनी तात्काळ रात्रीच्या काळोखातही घटनेचे गांभीर्य ओळखून रविवारी (दि.21) मध्यरात्री एक वाजता वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर लोंबकळत असणार्‍या तारा उपाययोजना करुन व्यवस्थित केल्या. त्याबद्दल चौलमळा येथील ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानून दाखविलेल्या तत्परतेबद्दल कौतुक केले.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, चौलमळा येथे संतोष घरत यांच्या मुलाच्या हळदीचा कार्यक्रम सुरु होता. रात्रीच्या सुमारास एका बाजूला जेवणाच्या पंक्ती उठत असताना, दुसरीकडे काही मंडळी नाचण्यात दंग होते. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. दरम्यान, मंडपाशेजारी असणार्‍या नारळाच्या झाडावरील झाप तारांवर पडला. त्यामुळे विजेचा प्रवाह सुरु असणार्‍या तारा तुटून लोंबकळत होत्या. त्याचवेळी प्रवाहित तारांमधून आगीच्या ठिणग्या बाहेर पडत होत्या. त्यामुळे काही काळ गोंधळ उडून लोक भयभीत झाले. याठिकाणी पूर्णपणे अंधार होता. या ठिकाणी चालत येणार्‍या व्यक्तीस तसेच मोटारसायकल व चारचाकी वाहनास सदर तारेचा अचानकपणे स्पर्ध होऊन गंभीर घटना होण्याची शक्यता होती. परंतु, त्याच सुमारास महावितरणचे कर्मचारी सूरज गावंड आपल्या घरी जात होते. प्रसंगावधान दाखवत त्यांनी येथून जाणारा प्रवाह खंडित केला. परिस्थितीचे गांभीर्य पाहून महातिवरणचे अन्य कर्मचारी शीतल राईलकर आणि नथुराम लोभी यांना तात्काळ संपर्क साधला. त्यांनीसुद्धा घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत होण्याकरिता हालचाली केल्या. मध्यरात्री विजेच्या खांबावर चढून तुटलेल्या तारांची जोडणी केली.

महावितरण विभागाची मदत पोहोचेपर्यंत चौलमळा गावचे प्रमुख रवींद्र घरत, भजन मंडळाचे अध्यक्ष अल्पेश म्हात्रे, सिद्धेश लोहार यांच्यासह ग्रामस्थांनी स्वतः या ठिकाणी थांबून जाणार्‍या-येणार्‍या लोकांना सदरील प्रकाराची माहिती देऊन दक्षता घेण्याबाबत सूचना केल्या. दरम्यान, महावितरणचे कर्मचार्‍यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे ग्रामस्थांनी बोलून दाखविले.

Exit mobile version