गो-ग्रीन सेवेचा पर्याय निवडणार्या ग्राहकांना सवलत
| मुंबई | प्रतिनिधी |
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महावितरण कंपनीने त्यांच्या ग्राहकांना नवीन वर्षाची भेट म्हणून गो-ग्रीन सुविधा निवडणार्या ग्राहकांना वीज बिलावर 120 रुपये सूट देण्याची घोषणा केली आहे. ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेंतर्गत महावितरणकडून गो-ग्रीन सुविधा राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. या योजनेंतर्गत महावितरणच्या ग्राहकांना त्यांच्या मासिक वीज बिलावर 10 रुपयांची सूट दिली जाते. अशातच आता पुढील बारा महिन्यांसाठी पहिल्याच वीज बिलात 120 रुपयांची सूट देण्यात आली आहे.
महावितरणच्या ग्राहकांनी जर गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडला तर त्यांना छापील कागदी वीज बिलांऐवजी ईमेलद्वारे वीज बिल पाठवण्यात येणार आहे. महावितरणने हा निर्णय गो-ग्रीन ग्राहकांसाठी घेतला आहे.
3 कोटी एलटी ग्राहकांपैकी आतापर्यंत केवळ 4 लाख 62 हजार म्हणजेच 1.15 टक्के ग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडला आहे. सध्या या सुविधेचा ग्राहकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा यासाठी किंवा गो-ग्रीन सुविधेचे प्रमाण अधिक होण्यासाठी महावितरणने गो-ग्रीन पर्याय निवडणार्या ग्राहकांना वर्षाच्या सुरुवातीलाच वीज बिलामध्ये 120 रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व वीज ग्राहकांना महावितरणकडून गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडण्यासाठी एसएमएस पाठविण्यात येणार आहेत.
जर ग्राहकांची मागणी कायम राहिल्यास पुढील वर्षीदेखील वीज बिलांवर 10 रुपये मासिक सवलत देण्यात येईल. त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा. त्यासोबतच अधिक माहितीसाठी ग्राहकांनी www.mahadiscom.in वर लॉग इन करावे.
– महावितरण