डिस्कव्हर रिसॉर्टचे पाणीबंद

कोल्हारे सरपंचांवर गुन्हा दाखल
नेरळ | वार्ताहर |
नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर धामोते गावाच्या हद्दीत असलेल्या डिस्कव्हर रिसॉर्टचा पाणीपुरवठा कोल्हारे ग्रामपंचायतीने बंद केला आहे. या रिसॉर्टच्या मालकीची नळपाणी योजना आपल्या अधिकारात येत नसतानादेखील थेट पाणीपुरवठा बंद करणार्‍या चार जणांवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि अन्य तिघे अशा चार जणांवर गुन्हा दाखल असून, रेसॉर्टचे पाणी बंद केल्याने रिसॉर्टमधील ग्राहकांचे हाल होत आहेत.
नेरळ जवळील डिस्कव्हर रिसॉर्टमध्ये धामोते गावातील महेश सुरेश विरले, राजेश उर्फ पपेश विष्णू विरले, भरत पदु पेरणे आणि सोमनाथ गणपत विरले हे 24 सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडे अकरा वाजता रिसॉर्टमध्ये पोहचले. तेथे कार्यालयात असलेल्या एचआर विभागाच्या योगिता कानसकर या तेथे कामावर असताना वरील चारही जणांनी तुम्ही कामगारांना विनाकारण त्रास देता अशी करणे देत योगिता कानसकर यांच्याशी हुज्जत घातली.त्या कारणावरून मनात राग धरून महेश सुरेश विरले, राजेश विरले, भरत पेरणे, सोमनाथ विरले यांनी या रिसॉर्टला होणारा पाणीपुरवठा ज्या उल्हास नदीवरून होतो, तेथे जाऊन पाणीपुरवठा बंद केला. उल्हास नदी येथून येणारी पाइपलाइन कापून नुकसान केले. त्यामुळे रिसॉर्टमध्ये असलेल्या कामगारांची तसेच आगाऊ बुकिंग करून पाहुणे म्हणून आलेल्या पर्यटकांची गैरसोय केली तसेच तुमचे रिसॉर्ट बंद करतो, अशी धमकी वरील चार जण देत असल्याबद्दल हॉटेलचे संचालक शैलेश सुभाष महाडिक यांनी एक ऑक्टोबर रोजी नेरळ पोलीस ठाणे येथे जाऊन तक्रार दिली.
नेरळ पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुनेश्‍वर अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version