| खोपोली | वार्ताहर |
यशवंती हायकर्स खोपोली यांचे वतीने गेले तिन वर्षापासून या संस्थेचे माजी अध्यक्ष व जेष्ठ गिर्यारोहक कै.नितीन यशवंत गावंड यांचे पुण्य स्मरणार्थ गिर्यारोहण, गडकिल्ले आणि निसर्ग व त्याच्या अनुषंगाने निगडीत असलेल्या विषयांवर, नामवंत व्यक्तिंची व्याख्याने आयोजित केली जातात. पुरातन बारव संशोधक रोहन काळे यांचे महाराष्ट्रातील अज्ञात बारवा (विहीर) या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली. प्रारंभी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या प्रमूख पाहूणे व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आल. दीपप्रज्वलनानंतर यशवंती हायकर्सचे विद्यमान अध्यक्ष महेंद्र भंडारे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते रोहन काळे(एवरेस्ट वीर), संतोष दगडे(वेध सह्याद्री), या संस्थेच्या गड -दुर्ग संवर्धन आणि सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे त्यांनी काही दिवसापूर्वी ईर्शाळवाडीत झालेल्या दुर्घटनेत विषेश मदत केल्याबद्दल तसेच प्रशांत पारधी यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर नियुक्ती झाल्याबाबत अशा सर्वांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. रोहन काळे हे सध्या एका मल्टीनॅशनल फार्मासाटीकल कंपनी मध्ये एच.आर.अश्या वरीष्ठ पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील अज्ञात बारवांचा आभ्यास करणारा, एका विशिष्ठ ध्येयाने प्रेरीत झालेला एक भटका निसर्ग मित्र जो बारवांचा आभ्यास म्हणजे त्यांचा शोध घेऊन, संशोधन करून त्यांच संवर्धन करण्यासाठी एक शिस्तबध्द अभियान राबवत आहे.
बारव ला वेगवेगळ्या ठिकाणी विविध नावे आहेत. कोणी त्यास बावडी, घोडेबाव, पोखरबाव तर काही ठिकाणी कुंड, पुष्कर्णी, पोखरण, हेलीकल, स्टेपवेल्स, स्टेप्ड टँक्स अशा विविध नावाने ओळखतात. रोहन ने कोवीडच्या काळात दोन वर्षे नोकरीस तिलांजली देवून स्वखर्चाने, असंख्य अडचणींवर मात करत, घरच्या विरोधास न जुमानता अज्ञात बारवच्या संशोधन व संवर्धना साठी स्वतःला झोकून दिले होते. मोटर सायकल वर दिवसरात्र जवळ जवळ 14000 कि.मी अंतराचा प्रवास करून राज्यातील सर्व जिल्हे, तालुके, गावे, डोंगर-दऱ्या पालथ्या घातल्या. प्रत्येक बारव ची ऐतिहासीक माहिती काढली. ती कोणी, कधी, कशासाठी बांधली याची माहिती गोळा केली. त्या संबंधीचे दस्ताऐवज जमा केले, तपासले. भविष्यात कोण्या अभ्यासूला या बारवांवरती पीएचडी करता येईल अशी पध्दतशीर माहिती, फोटो, मॅपींग, गुगल लोकेशन एकाक्लिकवर मिळू शकेल याची व्यवस्था केली. या कामात त्याने इतिहासकार, आर्किटेक्ट, पुरातन विभाग, स्थानिक बुजूर्ग तरूण यांची मदत घेतली व त्यांना या मोहिमेत सामील केले. महाराष्ट्रात जवळ जवळ 20 हजार बारवा आहेत. रोहन ने शोधलेल्या, पाहिलेल्या सर्व बारवांची माहिती त्याने त्याच्या वेबसाईटवर सर्वांना उपलब्ध करून दिली आह. ती सर्वांसाठी मोफत असून वापरायला अतिशय सहजसाध्य आहे. गडकिल्ले पहात असताना अशा बारवांनाही सर्वांनी भेट द्यावी हा हेतू आहे. एवढच नाही तर अशा बारवांचे वेगळे पर्यटन स्थळ करून तेथील स्थानिकांना रोजगार ऊपलब्ध व्हावा ही अभिलाशा रोहन बाळगून आहे.