| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीतील बाजारपेठ परिसरात वाढलेल्या रहदारीच्या समस्येबाबत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहरातील विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या बैठकीत मुरूड शहरातील बाजारपेठ परिसर व मुख्य रस्त्यांवरील वाढती वाहतूक कोंडी, अनियमित पार्किंग, अतिक्रमण व एस.टी. बस वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावर तोडगा म्हणून मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविणे, एस.टी. बस मार्गात आवश्यक ते बदल करून वाहतूक सुरळीत करणे, शहरात नियोजित पार्किंग व्यवस्था उभारणे या मुद्द्यांवर सखोल विचारविनिमय करण्यात आला.
बैठकीच्या शेवटी पोलीस निरीक्षक व मुख्याधिकारी यांनी विशेष पुढाकार घेऊन लवकरच अंमलबजावणी आराखडा तयार करून प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्याचे आश्वासन दिले. शहरातील रहदारी समस्येवर ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली असून नागरिकांकडून या निर्णयांचे स्वागत करण्यात येत आहे. यावेळी नगराध्यक्षा आराधना दांडेकर, उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत, मुख्याधिकारी सचिन बच्छाव, पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी नंदकुमार आंबेतकर, रचना अभियंता अनिकेत भोसले, बांधकाम अभियंता अनिकेत वाजे, कर निरीक्षक अनिकेत जगदाळे, संजय बामुगडे, वाहतूक पोलीस नाईक किशोर बठारे यांच्यासह व्यापारी, हॉटेल व रिक्षा, विक्रम चालक-मालक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, सर्व नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.







