। माथेरान । वार्ताहर ।
गेली अनेक वर्षे ब्रिटिशकालीन शार्लेट तलावाची स्वच्छताच करण्यात आलेली नाही. यामुळे तलावात दगड मातीचा गाळ मोठ्या प्रमाणात साचला असून त्याचा परिणाम तलावाच्या बंधार्यावर होत आहे. हा तलाव ब्रिटिशकालीन असल्याने त्याचा बांध आता कुमकुवत होऊ लागला आहे. त्याला अनेक ठिकाणी गळतीही लागायला सुरुवात झाली आहे. याचप्रमाणे हेच पाणी माथेरानमध्ये पिण्यास वापरत असल्याने हा बंधारा स्वच्छ होणे ही काळाची गरज आहे. परंतु, हा गाळ साफ होत नसल्याने अस्वच्छ पाणी माथेरानकरांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे. या गाळामुळे तलावाची पाणी साठवण क्षमताही कमी झालेली आहे. यामुळे दरवर्षी मे महिन्यामध्ये पाणीटंचाई सामोरे जावे लागत आहे.
या करता शासनाने 4.13 कोटी इतका मोठा निधी उपलब्ध करून दिला असून या निधीतून या बंधार्याची सुरक्षितता त्याची स्वच्छता व परिसराचे सुशोभीकरण यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. परंतु, आता पावसाळा संपत आला असून बंधारा ही तुडुंब भरला आहे. यामुळे याची स्वच्छता होणे शक्य नाही. यामुळेच निसर्ग पर्यटन शाल असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कदम यांनी याबाबत माथेरानचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना याबाबत विचारणा केली. यावेळी मुख्याधिकारी यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार सध्या हा विषय सनियंत्रण समितीकडे सोपविला असून त्यांच्या परवानगी नंतर त्या कामात सुरुवात होईल व टप्प्याटप्प्याने सर्व कामे पूर्ण केली जातील, असे सांगितले. यावेळी संघटनेचे सरचिटणीस जगदीश कदम, पालिकेचे लेखापाल अंकुश इचके हे उपस्थित होते.