| रसायनी | वार्ताहर |
देशात कामगार कल्याणासाठी लढणार्या राष्ट्रीय मूळ निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या पदाधिकार्यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर राष्ट्रीय महासचिव एन.बी.कुरणे, राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष घरत यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीतील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. कामगारांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावे, अशी मागणी केली. यावर आयुक्त मंगेश चितळे यांनीही कामगारांच्या रास्त मागण्यांकडे लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी नुरा शेख, जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा महासचिव संजय घरत, महासचिव सतीश चिंडालिया, सिध्दार्थ मोहिते व संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.