। मुंबई । प्रतिनिधी ।
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचा दारूच्या नशेत तोल गेल्यानं आणि 14 व्या मजल्यावरून पडून डोक्याला गंभीर इजा होऊन झाल्याचा निष्कर्ष सीबीआयने तपासात काढला आहे. यामुळे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर झालेले आरोप निरर्थक होते, हे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणेंपासून अनेकांनी गंभीर आरोप केले. राणेंनी या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवरही गंभीर आरोप केले. मात्र, आता या प्रकरणात सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. सीबीआयने सादर केलेल्या अहवालात दिशाचा मृत्यू अपघातीच होता, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे दिशाने आत्महत्या केल्याचा, बलात्कार झाल्याचा आणि खून झाल्याचे सर्व आरोप खोटे ठरले आहेत.