दोन वाहनांची समोरासमोर धडक; सात जण जखमी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग-पेण मार्गावर गुरुवारी (दि. 26) सकाळी दोन चारचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांमधील एकूण सात जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहीजण पेझारी व उसर परिसरातील असल्याचे समजते. हा अपघात मैनुशेठ वाडा परिसरात समोरासमोर झाला असून, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, उसर येथील इरटीका कार चालक आपल्या वाहनासह पेणहून अलिबागमार्गे उसरकडे येत होते. त्याच वेळी समोरून येणाऱ्या इको गाडीशी त्यांची जोरदार धडक झाली. मैनुशेठ वाडा येथे दोन्ही वाहन चालकांचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा समोरासमोर अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.
या धडकेत दोन्ही वाहनांच्या चालक बाजूचा भाग मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला असून, काही वाहनांची पुढील चाके निखळून पडल्याची माहिती आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. जखमींना तात्काळ मदत करून अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यापैकी तिघांना गंभीर दुखापत झाली असून, उर्वरित चार जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.






