तटकरेंबाबत मुस्लिम समाजात नाराजी

| आंबेत | वार्ताहर |

येणारा काळ हा शिवसेनेचा असेल, असं प्रतिपादन माजी आ.तुकाराम सुर्वे यांनी म्हसळ्या‌तील एका कार्यक्रमात केले आहे. त्यामुळे या चर्चांना उधाण आल्याचं दिसून येत आहे. श्रीवर्धन मतदार संघात देखील आता मुस्लिम समाजाकडून खा.सुनील तटकरे यांच्याबाबती नाराजी व्यक्त होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. ठाकरे गटाकडून घेण्यात आलेल्या बाईकरॅलीत तटकरे यांच्या राष्ट्रवादीतील असंख्य मुस्लिम युवक सहभागी झाले होते. त्यामुळे ही नाराजी आता चव्हाट्यावर आली आहे.

म्हसळा येथील मेळाव्यात तटकरेंवर थेट निशाणा साधत सुर्वे यांनी स्वतःच्या अडचणी निर्माण झाल्यानंतर जनतेला वाऱ्यावर सोडणारे तटकरे हे स्वार्थी असून त्यांना येणारा काळ हा धडा शिकवेल असा खोचक टोला जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी लगावला. येणारा काळ हा शिवसेनेचा असून पक्षाकडून संकेत मिळालेले अनिल नवगणे हेच पुढचे श्रीवर्धन मतदार संघाचे उमेदवार असतील असा खुलासा सुर्वे यांनी यावेळी केला. त्यामुळे कार्यकर्त्यांना कामाला लागा, नवगणे हे स्थानिक असल्याने त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

यावेळी अनिल नवगणे, नंदू शिर्के, रवींद्र लाड, अमित म्हामूणकर, डॉ. मुईज शेख, मुसद्दीक इनामदार, सुरेश कुडेकर, अनिकेत पानसरे, राखी करंबे, अजय करंबे, कौस्तुभ करडे, दीपल शिर्के, राहुल जैन, महिला आघाडी प्रमुख रीमा म्हामूनकर यांसह म्हसळा जमातुल मुस्लिम सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version