महाडमध्ये महाविकास आघाडीत सवतासुभा

मोर्चात सेना राष्ट्रवादीने काँग्रेसला डावलले
निघाल्या दोन वेगवेगळ्या रॅली,बंदला संमिश्र प्रतिसाद
। महाड । वार्ताहर ।
लखीमपूर खीरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये महाडमध्ये आघाडीतील सवता सुभा दिसून आला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र आणि काँग्रेसने स्वतंत्र रॅली काढून या बंदमध्ये सहभाग घेत हत्याकांडाचा निषेध नोंदविला. शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. तासा दिडतासात दोन्ही पक्षांच्या रॅली संपल्यानंतर महाडमधील सर्व व्यवहार दिवसभर सुरळीत सुरु होते.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवाजी चौकातून बाजारपेठेत रॅली काढली. यात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पद्माकर मोरे, तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, विजय सावंत,जि.प.सदस्य जितेंद्र सावंत शिवसेनेचे नगरसेवक, राष्ट्रवादीचे सुरेश निकम, तालुकाध्यक्ष निलेश महाडिक, जयेश देशमुख आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.
त्या नंतर काँग्रेस पक्षाने काढलेल्या रॅलीत काँग्रेसचे नेते हनुमंत जगताप, नाराध्यक्ष स्नेहल जगताप, तालुकाध्यक्ष राजेंद्र कोरपे, काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.महाडमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष कांग्रेस पक्षाला जाणिवपूर्वक डावलत असल्याचा आरोप तालुकाध्यक्ष राजेंद्र कोरपे यांनी रॅली संपल्यानंतर केला. एकला चलो रे ची भूमिका घेण्याची वेळ आल्यास काँग्रेस त्यासाठी सज्ज आहे असे ते म्हणाले. शहरात या बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

Exit mobile version