23 जणांवर अपात्रतेची टांगती तलवार

| तळा | वार्ताहर |

ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांनी केलेल्या खर्च न दिल्यामुळे तळा तालुक्यातील 23 उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक लढविणार्‍या प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीत केलेल्या खर्चाचा तपशील द्यावा लागतो. त्यासाठी उमेदवाराचा एक बँक खाते क्रमांक निवडणूक विभागाला लिंक केलेला असतो. निवडून आलेल्या उमेदवारांसह बिनविरोध, पराभूत उमेदवार असलेल्या उमेदवारांना केलेल्या खर्चाचा तपशील आयोगाला देणे बंधनकारक आहे. अनेकदा बिनविरोध झालेले उमेदवार आणि पराभूत झालेले उमेदवार याकडे दुर्लक्ष करतात, पण काही निवडून आलेले उमेदवारही खर्च निवडणूक विभागाकडे सादर करत नाहीत अशा उमेदवारांवर जिल्हाधिकारी अपात्रतेची कारवाई करतात.

ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये तळा तालुक्यात सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीतील 23 उमेदवारांनी अद्याप निवडणूक खर्च दिलेला नाही. त्यामुळे या सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. ते निवडून आलेले असतील तर ते अपात्र ठरतील, मात्र, पराभूत असतील तर त्यांना आगामी पाच वर्षे निवडणूक लढता येत नाही. यामध्ये सर्वाधिक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे असून, या सदस्यांवर कारवाई झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा हादरा असेल असे बोलले जाते.

Exit mobile version