सुधागडात धम्मध्वजाचा अवमान

बौद्ध समाजाकडून तपासाची मागणी

| पाली/वाघोशी | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यातील भालगुल हद्दीत बंद पडलेल्या अल्ट्राटा डायटेक या कारखान्याच्या आवारात 31 ऑक्टोबर रोजी गौतम बुद्धांची मूर्ती आढळून आल्यानंतर उद्भवलेल्या प्रकरणात आता नवीन वळण आले आहे. याठिकाणी लावण्यात आलेला बौद्ध धम्माचा पंचशील ध्वज कोणीतरी काढून टाकल्याच्या प्रकारामुळे स्थानिक बौद्ध समाजात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

यासंदर्भात सुधागड तालुक्यातील बौद्ध बांधवांनी माननीय तहसीलदार कार्यालय, पाली सुधागड येथे लेखी अर्ज देत या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

बौद्ध बांधवांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मूर्ती सापडल्याची माहिती मिळताच त्यांनी पाली पोलीस ठाणे तसेच तहसीलदार कार्यालयास कळविले होते. यानंतर नायब तहसीलदार, अधिकारी तसेच पाली पोलीस ठाण्याचे पीआय व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली होती. तसेच पंचनामा करून पुरातत्त्व विभागाला लेखी प्राचारण करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते.

मात्र, त्यानंतर इतक्या दिवसांत ना तहसील कार्यालयाकडून, ना पोलीस प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप बांधवांनी केला आहे. या प्रकाराची तात्काळ चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई न झाल्यास, सुधागड तालुक्यातील सर्व बौद्ध बांधव उग्र आंदोलन करण्यास बाध्य होतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी राहुल सोनवणे (रिपाई), रायगड जिल्हा संपर्कप्रमुख, भगवान शिंदे, रवींद्र ओव्हाळ, भावेश गायकवाड, मारुती गायकवाड, नरेश गायकवाड, संदेश भालेराव, निवास सोनवणे, दिलीप मोरे, अनिकेत गायकवाड, योगेश गायकवाड, नितीन गायकवाड, नितीन वाघमारे, स्वप्निल गायकवाड, साजन शिंदे, दिनेश गायकवाड, मनोज साळुंखे, मिलिंद शिंदे, सतीश गायकवाड, श्रेयस भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version