कुठे कपडे-मासळी वाळवली जाते, तर कुठे वाहनांची पार्किंग
| चिरनेर | दत्तात्रेय म्हात्रे |
ज्या हुतात्म्यांनी देशासाठी छातीवर ब्रिटिशांच्या गोळ्या झेलल्या, त्यांच्याच स्मारकांना आज शासनाच्या अनास्थेने उकिरड्याचे स्वरूप आले आहे. चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्मरण जपण्यासाठी उभारण्यात आलेली चिरनेर, खोपटा, कोप्रोली, पाणदिवे, धाकटी जुई, मोठी जुई आणि दिघोडे येथील स्मारके आज अक्षरशः अडगळीत पडली आहेत. काही ठिकाणी कपडे, मासळी व धान्य वाळवण्यासाठी, तर काही ठिकाणी वाहने पार्क करण्यासाठी या स्मारकांचा वापर होत असल्याने स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
25 सप्टेंबर 1930 रोजी झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहावर ब्रिटिश सरकारने बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात धाकू बारक्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी (चिरनेर), रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), रामा बामा कोळी (मोठी जुई), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हसूराम बुधाजी घरत (खोपटा) आणि आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या आठ सत्याग्रहींनी बलिदान दिले, तर 38 आंदोलक जखमी झाले. या हुतात्म्यांचा इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचावा म्हणून शासनाने त्यांच्या मूळ गावी स्मारके उभारली. मात्र, स्मारके उभारून शासनाची जबाबदारी संपली का? देखभाल-दुरुस्तीसाठी निधी नसल्याने आज या स्मारकांची अवस्था पाहण्यासारखी झाली आहे. या स्मारकांची देखभाल कोणत्या विभागाने करायची, यावरून ग्रामपंचायत, उरण पंचायत समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जबाबदारी झटकली जात असल्याचे चित्र आहे. परिणामी, हुतात्म्यांच्या स्मृतींची ही स्थळे दुर्लक्षित राहिली आहेत. काही स्मारकांवरील पत्रे उडाली आहेत, काही ठिकाणी सिलिंग कोसळले आहे. गुरेढोरे आणि भटक्या कुत्र्यांसाठी ही स्मारके आसरा बनली आहेत. ज्यांच्या बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्याचा श्वास मिळाला, त्यांच्या स्मारकांवर आज अशी वेळ यावी, यापेक्षा दुर्दैवी बाब कोणती? दरवर्षी चिरनेर येथील मुख्य स्मारकाजवळ हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम होतो. त्यामुळे त्या स्मारकाची डागडुजी केली जाते. मात्र, इतर गावांतील स्मारकांकडे वर्षभर ढुंकूनही पाहिले जात नसल्याने त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे.
हुतात्म्यांच्या स्मारकांसाठीही निधीची प्रतीक्षा?
एकीकडे स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास जपण्याच्या घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात हुतात्म्यांच्या स्मारकांची अशी दुरवस्था होत असेल, तर या घोषणांचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे. स्मारक कोणाच्या ताब्यात यापेक्षा त्याची अवस्था सुधारण्याची जबाबदारी कोण घेणार, हा खरा प्रश्न आहे. हुतात्म्यांच्या स्मृतींचा हा अपमान थांबवून सातही स्मारकांची तातडीने पाहणी, दुरुस्ती आणि नियमित देखभालीची व्यवस्था करावी, अशी मागणी स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांकडून होत आहे.
स्मारकाच्या दुरुस्ती व देखभालीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
भास्कर मोकल,
सरपंच, चिरनेर
मागील अनेक वर्षांपासून या स्मारकांचा ताबा अद्यापही राजिपकडेच आहे. निधी उपलब्ध करून देण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. निधी उपलब्ध झाल्यास स्मारकांची दुरुस्ती करणे शक्य होईल.
डी.एम. पाटील,
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, उरण
