| नवीन पनवेल | वार्ताहर ।
आशिया खंडातील सर्वात मोठा पोलाद बाजार असलेल्या कळंबोली स्टील मार्केटच्या प्रवेशद्वारावर सुस्थितीतील रस्त्याची खड्ड्याने चाळण केली आहे. याबाबत प्रशानाकडे तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थे आहे. अशातच पावसाने उघडीप दिली असताना रस्त्यावर पाणी साचलेले असल्याने नागरिकांसह व्यापार्यांची गैरसोय होत आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून स्टील मार्केटच्या प्रवेशद्वारावरील पनवेल मुंब्रालागतचा नाला तुंबलेला आहे. रस्त्याचे काम करताना चुकीच्या पद्धतीने नाला बुजवला गेल्यामुळे नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून वाहतूकदार संघटनेचे नेते रामदास शेवाळे यांनी याबाबत महापालिकेशी अनेकदा पत्रव्यवहारदेखील केला. पण पाणीउपसा करण्यासाठीचा पंप लावण्यापलीकडे महापालिकेने कुठलीही उपाययोजना केलेली नसल्याने सध्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांचे विघ्न आहे.
बाजार समितीचे दुर्लक्ष
कळंबोली स्टील मार्केटमध्ये देशभरातून मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक होत असते. शेकडो माथाडी कामगार, व्यापारी व वाहतूकदार दररोज कामानिमित्त ये-जा करतात. अशातच प्रवेशद्वारावर साचणारे पाणी आणि त्यामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे; परंतु लोखंड पोलाद बाजार समितीकडून याविषयी कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा होत नसल्याने बाजारामधील गाळेधारक, माथाडी कामगार व वाहतूकदारांमध्ये नाराजी आहे.