विचुंबेत नैना विरोधात असंतोष

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे नैनाचे अतिक्रमण विभाग चार माळ्याची इमारत तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्तासह आले होते. मात्र यावेळी त्यांना शेतकर्‍यांनी प्रचंड विरोध केला. व नैनाच्या अधिकार्‍यांना रिकाम्या हाती परतावे लागले.तालुक्यातील 23 गावांमध्ये नैना प्रकल्प येऊ घातलेला आहे. 2012 ते 2022 पर्यंत या दहा वर्षांपासून नैनाचे भिजत घोंगडे आहे. प्रकल्पाला येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध आहे. गावागावांमध्ये नैना विरोधात असंतोष पसरला आहे. 26 जुलै रोजी नैनाचे अतिक्रमण विभाग विचुंबे येथे तोडक कारवाई करण्यासाठी आले होते. याची माहिती नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांना मिळताच त्यांनी या ठिकाणी धाव घेतली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता. ग्रामपंचायतची परवानगी घेऊनच ही इमारत उभी केलेली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून नैनाने तालुक्याचा कोणता विकास केला असा सवाल यावेळी शेतकर्‍यांनी केला.
चार मजली इमारत पाडण्यासाठी नैनाचे अधिकारी जेसीबी व पोकलनसह आले होते. मात्र त्यांना शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी समितीचे अध्यक्ष वामन शेळके, नामदेव फडके, राज पाटील, डिके भोपी, शेखर शेळके, वासुदेव भिंगारकर, बाळा फडके, गजानन पाटील, बबन फडके, किशोर सुरते, निलेश वाघमारे, वामन वाघमारे, अनिल ढवळे, सुधाकर लाड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Exit mobile version