। नवीन पनवेल । वार्ताहर ।
मालेवाडी सुकापुर येथील श्री युनिटी कॉम्प्लेक्स येथे नैनाने बुधवारी तोडक कारवाई केली. मात्र ही कारवाई अर्धवट केल्याने याकडे संशयाने पाहिले जात आहे.
पनवेल तालुक्यातील 23 गावांमध्ये नैना येऊ घातलेली आहे. नैनाची कोणतीही परवानगी न घेता सुकापुर, आकुर्ली, मालेवाडी, विचुंबे, देवद, चिपळे, आदी परिसरात अनधिकृत इमारती उभ्या राहत आहेत. अनेक अनधिकृत इमारतींची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र नैना याकडे डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे.
इमारतीचे काम सुरू असताना नैनाचे अधिकारी यावर कारवाई करत नाहीत. इमारत उभी राहिल्यानंतर फक्त दाखवण्यासाठी थोडीफार कारवाई केली जाते. त्यामुळे नैनाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. यात आर्थिक व्यवहार झाले असल्याचे बोलले जात आहे. गरीब नागरिक आपल्या आयुष्याची जमापुंजी घर घेण्यासाठी लावतो. त्यातच अनधिकृत इमारतीत घर घेतल्यानंतर त्याची आयुष्याची पुंजी वाया जाते. मात्र नैना-सिडकोला याचे काहीही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. दोन आठवड्यांपूर्वी मालेवाडी सुकापुर येथील लक्ष्मी पब्लिक स्कूल समोरील इमारतीवर नैनाचे अधिकारी कारवाईसाठी आले होते मात्र केवळ चार ते पाच कॉलम तोडून ही अर्धवट कारवाई करण्यात आली होती.
बुधवारीदेखील मालेवाडी येथे अशाच प्रकारची अर्धवट कारवाई करण्यात आली. अनधिकृत इमारतींवर अर्धवट कारवाई करून नैना प्राधिकरण काय साध्य करू पाहत आहे हे सामान्य नागरिकांना समजत नाही. आर्थिक व्यवहारामुळे अशा प्रकारे अर्धवट कारवाई होत जात असल्याचा आरोप केला जात आहे. अनेक ठिकाणी कोणत्याही परवानगी न घेता इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे नागरिकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. मालेवाडी येथे नैनाकडून कारवाईचा केवळ दिखावा करण्यात आला. जून महिन्यात विचुंबे येथे देखील अर्धवट कारवाई करण्यात आली होती. तर एप्रिल महिन्यात सुकापूर येथील मौर्या नामक बांधकाम व्यावसायिक बांधत असलेल्या 4 ते 5 माळ्याची स्वप्नपूर्ती सोसायटी या इमारतीवर देखील कारवाई न करता अतिक्रमण विभाग माघारी गेले होते. या बाबत नैना अधिकार्यांवर संशय व्यक्त केला जात आहे.