। वेनगाव । वार्ताहर ।
स्वच्छ भारत अभियानाला वेनगाव ग्रामपंचायत केराची टोपली दाखवत असल्याने चित्र पाहायला मिळत आहे. राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्यात स्वच्छ शहर गाव असा नारा देत स्वच्छ भारत अभियान चालवत आहेत. अनेक ठिकाणी स्वच्छतेवर भर देऊन शासनाच्यावतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात येत असून कर्जत तालुक्यातील वेनगाव ग्रामपंचायत स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून, वेनगाव ग्रामपंचायतीत मात्र या स्वच्छ भारत अभियानाचे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे.
ग्रामपंचायत परिसरात काही ठिकाणी गटारांचे सांडपाणी साचून रस्त्यावर येत आहे. त्यामुळे येथील गटारे तुंबलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. काही महिन्यापूर्वी ग्रामपंचायत परिसरात रोगराई पसरू नये याकरिता नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने मच्छर व इतर कीटकनाशक जीव-जंतू मारण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये धूर फवारणी मशीन मागविण्यात आणली आहे. सध्याचे चित्र पाहता पूर्ण पावसाला संपायला आला असून गावात अद्यापपर्यंत कुठेच मशीनद्वारे फवारणी केली नसल्याने ती मागण्यात आलेली मशीन ग्रामपंचायत कार्यालयात तशीच वापराविना पडून आहे.
त्यामुळे गावात भरमसाठ प्रमाणात मच्छर वाढले आहेत. या मच्छरमुळे गावात मलेरिया- डेंग्यू सारखा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायतीच्या अशा दुर्लक्षित गलथान कारभारामुळे येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येवू शकते. वेनगाव गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरकडे जाणार्या रस्त्याच्या दोन्ही बाजूचे गटार पूर्ण भरले आहे. येथील रस्त्याच्या बाजूस पावसाळ्यात गवत, झाडी-झुडपे वाळलेली आहेत. हे स्वच्छ करण्यास सदर ग्रामपंचायतीला वेळ नाही. येणारे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने येथून जाताना दुर्गंधी येते आहे. गटार भरल्याने सांडपाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गावातील अनेक गटारांची हीच अवस्था आहे, मात्र ग्रामपंचायत डोळ्यावर पट्टी लावून बसली असल्याचे जाणवते. याबाबत येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत अनेक वेळा कळवून सुध्दा दुर्लक्ष करीत आहे. गावातील गटारे स्वच्छ करून रस्त्यावर वाडलेले गवत झाडी-झुडपे कापून संपूर्ण गावात मच्छर फवारणी करण्यात यावी. गावात स्वच्छतेबाबत उद्भवणार्या समस्यांचे निवारण करण्यात यावे अशी येथील ग्रामस्थांची मागणी होत आहे.