झिरो आधारकार्ड लाभार्थ्यांना धान्य वाटप करा

रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आदेश

| पेण | प्रतिनिधी ।

झिरो आधारकार्ड लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी मधूकर बोडके यांनी दिले आहेत.

झिरो आधारकार्डच्या नावाखाली धान्याची विल्हेवाट लावली जात असल्याचे कृषीवलने जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यावेळेला जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील पुरवठा अधिकार्‍यांशी चर्चा करून सर्वांना धान्य देण्याचे आदेश देणार असल्याचे त्यांनी सुचित केले.

जिल्हयात 40 हजारांच्या जवळपास झिरो आधारकार्ड असलेले लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांच्या नावे स्वस्त धान्य दुकानदारांना दर महिन्याला धान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. परंतु, ऑनलाइन यंत्रणेचा गैरफायदा स्वस्त धान्य दुकानदारांकडून घेण्यात येऊन तुमचे आधारकार्ड लिंक नसल्याचे सांगण्यात येते. हेच धान्य नंतर जाते कोठे हा प्रश्‍न असून, याचा हिशोब पुरवठयाच्या दप्तरी मात्र लाभार्थ्यांना धान्य वाटप झाले असाच ठेवण्यात येत आहे का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एकंदरीत झिरो आधारकार्ड लाभार्थ्यांची संख्या बघता दरमहा हजारो क्विंटल धान्य हडप करण्याचा प्रकार मात्र सर्रास सुरू आहे. जिल्हयासह राज्यस्तरावरील झिरो आधारकार्ड लाभार्थ्यांचा धान्याचा हा प्रश्‍न असून पुरवठा विभागाने गंभीर पावले उचलणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणण्यात आले.

शासनाकडून झिरो आधारकार्ड लाभार्थ्यांचा धान्याचा पुरवठा होतो. मात्र तो लाभार्थ्यांना देण्यात येत नाही. असे असताना स्वस्त धान्य दुकानदारांनी देखील झिरो आधारकार्ड लाभार्थ्यांचे आधार लिंक करून धान्याचे रितसर वाटप करणे आवश्यक आहे. परंतु असे केल्यानंतर झिरो आधारकार्ड लाभार्थ्यांचे धान्य मिळणार नाही. त्यामुळे धान्याचा पुरवठा तर होत आहे ना मग आधारकार्ड लिंक करायचे कशासाठी असा तर प्रश्‍न दुकानदारांना पडत नाही ना अशी चर्चा सुरू आहे.

आधार लिंक असो वा नसो शिधापत्रिका मिळाली म्हणजे तो धान्य घेण्यास लाभार्थी पात्र झाला आहे. असे जर होत नसेल तर जिल्हयातील सर्व तालुका पुरवठा अधिकार्‍यांना या बाबत विचारणा करून झिरो आधार कार्ड धारकांना देखील धान्य देण्याचे आदेश त्यांना आदेश दिले जातील.

मधूकर बोडके
जिल्हा पुरवठा अधिकारी
Exit mobile version