विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संच वाटप

आविष्कार,मारुती फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
। माणगाव । वार्ताहर ।
सामाजिक व शैक्षणिक कार्यात आग्रेसर असणार्‍या आविष्कार फाऊंडेशन इंडिया व मारुती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांच्या विशेष सहकार्याने तालुक्यातील दहा गावांतील इयत्ता नववी ते इयत्ता बारावी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 71 पाठ्यपुस्तक संचांचे वाटप करण्यात आले. आविष्कार फाऊंडेशन व मारुती फाऊंडेशन यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

आविष्कार फाऊंडेशन व मारुती फाऊंडेशन या सेवाभावी संघटनांतर्फे तालुक्यात दरवर्षी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत. यावर्षीही या फाऊंडेशनकडून माणगाव तालुक्यातील तासगाव व सांगी आदिवासीवाडी, कालवण, देगाव, हातकेली, माणगाव, उणेगाव, पानोसे, पेण तर्फे तळे, रातवड हायस्कूल, होडगाव आदी गावांतील गरीब व होतकरू अशा इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आविष्कार फाऊंडेशनचे जिल्हा कार्याध्यक्ष शंकर शिंदे गुरुजी व मारुती फाऊंडेशन पेण तर्फे तळे, ता. माणगावचे अध्यक्ष अजित शेडगे यांच्या पुढाकाराने व पनवेलचे उद्योजक गणेश काजरोळकर, होडगाव ता. माणगाव येथील कै. कल्याणी खाडे यांच्या स्मरणार्थ श्री गोरक्ष मंदिर माणगाव मठाचे अध्यक्ष शांताराम बाळू खाडे महाराज यांसकडून तसेच आम्ही रायगडचे शिलेदार,आई कनकाई सामाजिक संस्था होडगाव कोंड ता. माणगाव संस्थापक सुशील कदम, शिवम कॉम्प्युटर सेंटरचे संस्थापक संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र खाडे, निर्धार सामाजिक संस्था,बाळाराम मांडवकर व रजनी उभारे, प्रसाद उभारे,किशोर वेदपाठक, निलेश आयरे,दीपक ठाकूर यांनी देणगी रूपाने केलेली मदत यांच्या सहकार्याने 71 पाठयपुस्तक संचाचे वाटप करण्यात आले.

Exit mobile version