लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप

शासन आपल्या दारी उपक्रम; जिल्हा परिषदमार्फत अंमबजावणी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणार्‍या वेगवेगळ्या विभागामार्फत रायगडजिल्ह्यातील लाभार्थ्यांना योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या स्व. ना.ना. पाटील सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. शासन आपल्या दारी उपक्रमाची रायगड जिल्हा परिषदमार्फत प्रभावी अंमबजावणी करण्यात येत असून, या उपक्रमअंतर्गत जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती व पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ प्रत्यक्ष मिळवून देण्यात येत आहेत.

महीला व बालकल्याण, स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण पाणी पुरवठा, ग्रामपंचयत, समाजकल्याण, सामान्य प्रशासन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण, कृषी विभागातील मोजक्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना तालुका स्तरावर प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, महिला व बालकल्याण विभाग निर्मला कुचिक यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.

शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात अधिकारी व कर्मचारी यांनी उत्तम काम केले आहे. लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळत आहे. नागरिक व प्रशासनाने हातात हात घालून काम केल्यास प्रत्येक योजना सफल होते. जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत योजना कशी पोहचेल व लाभार्थ्यांना लाभ मिळेल या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

डॉ. किरण पाटील
मुख्य कार्यकारी अधिकारी
Exit mobile version