आदिवासी बांधवांना दाखल्यांचे वाटप

कर्जत | वार्ताहर |
कर्जत तालुक्यात कातकरी उत्थान व सप्तसूत्री अंतर्गत कातकरी आणि आदिवासी बांधवांना विविध प्रकारच्या 994 दाखल्यांचे वाटप करण्यात आले. रायगड जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 11.58 टक्के लोकसंख्या आदिवासी बांधवांची आहे. त्यापैकी 40 टक्के लोकसंख्या कातकरी बांधवांची आहे. शासन स्तरावरून आदिवासींचा आर्थिक सामाजिक विकास करण्याकरिता अनेक योजना राबवल्या जातात; परंतु तरीही आदिवासी बांधव अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहेत.

रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यात कर्जत येथे कातकरी उत्थान व सप्तसूत्री अंतर्गत उपविभागीय अधिकारी (प्रांत) अजित नैराळे यांच्या हस्ते कातकरी आणि आदिवासी बांधवांना 994 विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, पुरवठा विभाग नायब तहसीलदार बी.टी. बुरसे उपस्थित होते. यावेळी जातीचे प्रमाणपत्र 459, रेशनकार्ड 170, रहिवासी दाखले 192, उत्पन्नाचे दाखले 173 अशा एकूण 994 दाखल्यांचे वाटप करण्यात आले, अशी माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.

Exit mobile version