पाली नगरपंचायतीतर्फे क्लोरीनचे वाटप सुरू

| सुधागड-पाली | प्रतिनिधी |

अंबा नदीला आलेला पूर ओसरल्यानंतर पाणीपुरवठ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पूरस्थितीमुळे रस्ते बंद, वाहतूक ठप्प झाल्याने पाणी शुद्धीकरणासाठी लागणारी क्लोरीन औषधे नगरपंचायतीकडे पोहोचण्यात उशीर झाला. तथापि पाली नगरपंचायतीने नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत आजपासून संपूर्ण शहरात क्लोरीन औषधांचे वाटप सुरू केले आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी पूरस्थितीत प्रथम नागरिकांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित केले होते. त्यानंतर पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे.

नगरपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, पालीकरांच्या हितासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने प्रशासन जागरूक आहे. औषधांच्या पुरवठ्यात झालेला विलंब हा केवळ पूरस्थितीमुळे झाला असून आता नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पाणी मिळावे यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत.

यावेळी पाली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पराग मेहता यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की, पावसाळ्याच्या काळात विविध संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे पिण्याचे पाणी उकळून किंवा शुद्ध करूनच वापरावे. परिसरात पाणी साचू देऊ नये व स्वच्छता राखावी. डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणी, रिपेलंट किंवा इतर उपायांचा वापर करण्याचे आवाहन नगराध्यक्षांनी नागरिकांना केले आहे.

Exit mobile version