| पाली/गोमाशी | वार्ताहर |
संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथे सुमेध खैरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 28) विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर, पेन, चप्पल, मानव विकास अंतर्गत सायकल, गणवेश या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना सुरेश खैरे म्हणाले की, सुरुवातीला हे विद्यालय पोल्ट्रीच्या इमारतीमध्ये अल्प विद्यार्थ्यांवर पंचक्रोशीतील नागरिकांच्या सहकार्याने सुरू केले. आज ही शाळा आयएसओ मानांकन प्राप्त, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला, तसेच या शाळेचा दहावी आणि बारावीचा निकाल तालुक्यात अव्वल आहे. या शाळेच्या प्रगतीमध्ये माजी विद्यार्थी, शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अतुल म्हात्रे यांनी सांगितले की, माझीदेखील शैक्षणिक सुरुवात एका ग्रामीण भागातील शाळेतून झाली. मलादेखील उच्च शिक्षणासाठी पनवेल, मुंबई, परदेशात लंडन येथे जाऊन मास्टर ऑफ आर्किटेक्ट पदवी घ्यावी लागली. यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. आपल्याला जर यश संपादन करायचे असेल, तर मेहनत करा अशक्य असे काहीच नाही. दरम्यान, यावेळी महाबँक सेवानिवृत्त परिवाराकडून दप्तर, गणवेश, वह्या, कंपास, कपाट, सुशील चोरघे माजी विद्यार्थी यांच्याकडून 100 विद्यार्थ्यांसाठी चप्पल जोड, माजी विद्यार्थी एकनाथ हळदे यांच्याकडून 200 पेन, आनंद वाचन चळवळ पुणे शालेय वाचनालयासाठी 100 पुस्तके भेट देण्यात आली.