| माथेरान | प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक विचारवंत व लेखक महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षण, अस्पृशता निवारण व शेतकरी हक्कांसाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी माथेरानच्या हुतात्मा भाई कोतवाल शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली.
याप्रसंगी माथेरान नगरपरिषदेचे कार्यक्षम शिक्षण सभापती सुनील शिंदे, नगरसेवक मनोज खेडकर शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे व अन्य शिक्षक उपस्थित होते. मनोज खेडकर यांनी हुतात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार शालेय विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालत आहे त्यामुळेच तो एक संघ टिकला आहे. शिक्षण सभापती सुनील शिंदे यांनी प्रशांत गायकवाड यांच्या उत्तम नेतृत्वाखाली तरुणांनी असेच सामाजिक कार्य करत राहावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी समितीचे उपाध्यक्ष सुशांत गायकवाड, प्रवीण गायकवाड, शुभम गायकवाड, हिमांशू सोनवणे, अनिल नाईकडे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.







