| पेण | प्रतिनिधी |
पेण शहरात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. दारूच्या नशेत थेट पेण पोलीस ठाण्यात घुसून पोलीस कर्मचाऱ्यांनाच आरडाओरडा आणि अश्लील शिवीगाळ करणाऱ्या डॉ. संगम पाटील यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
या प्रकरणाला राजकीय रंगही चढल्याचे दिसून येत आहे. संबंधित डॉ. पाटील हे एका राजकीय पक्षाचे माजी-माजी पदाधिकारी असल्याची समजते. त्यामुळे त्यांची सुटका व्हावी यासाठी त्या पक्षाच्या एका माजी आमदारांनी जोरदार प्रयत्न केल्याची चर्चा शहरात रंगली होती. मात्र, पोलिसांशी केलेल्या त्यांच्या उद्धट आणि बेजबाबदार वर्तनामुळे हे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
समाजात आरोग्य सेवा देणाऱ्या जबाबदार व्यवसायात असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे असभ्य वर्तन अपेक्षित नसल्याने सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांनाच धमकावण्याचा प्रयत्न होत असेल, तर सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा?’ असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या घटनेमुळे पेण शहरात एकच चर्चा रंगली असून, कायद्यापुढे सर्व समान असल्याचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.







