आदिवासी शेतकर्‍यांना मोफत विळे वाटप

कोकण कृषी विद्यापीठाच्या वाहन चालक संघटनेची सामाजिक बांधिलकी
। खोपोली । प्रतिनिधी ।
कोकण कृषी विद्यापीठाच्या वाहन चालक संघटनेने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत व विस्तार शिक्षण विभाग कृषी महाविद्यालय, दापोली यांच्या सहकार्याने कर्जत तालुक्याच्या चाहुची वाडी येथील 25 आदिवासी शेतकरी जोडप्यांना वैभव विळ्याचे मोफत वाटप केल्याने संघटनेचे कौतुक होत आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक कृषी संशोधन, कर्जतचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. शिवराम भगत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. प्रमोद सावंत, वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष राजेश विचारे, विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने, संघटनेचे सचिव संजय पवार, कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. प्रवीण झगडे, माजी उपसरपंच धर्मा निर्गुडा, विलास इलग, नवीन कांबळे, किसन ढोले उपस्थित होते.

डॉ. सावंत यांनी आदिवासी शेतकरी बंधू-भगिनींच्या शेतीविषयक जिज्ञासा व कष्टाबद्दल प्रशंसा करीत वाहन चालक संघटना सातत्याने अत्यंत स्तुत्य व अनुकरणीय उपक्रम राबवित असल्याबाबत गौरवोद्गार काढले. आदिवासी उपयोजनेंतर्गत या भागात विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. डॉ. भगत म्हणाले की, वैभव विळ्याने भाताची कापणी जमिनीलगत होते. खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो व अधिक पेंढा मिळतो. या विळ्याची पकड अधिक चांगली असून, वजनास हलका, समतोल साधणारा, सहज कार्यक्षम कापणी करणारा असल्याने शेतकर्‍यांना खूपच उपयुक्त आहे. शेतकर्‍यांनी रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळावे व परंपरागत बियाणे जतन करावे, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी राकेश विचारे, धर्मा निर्गुडा, विलास इलग यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे व मान्यवरांनी क्रांतिकारी आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन व दीप प्रज्ज्वलन केले. याप्रसंगी डॉ. सावंत, डॉ. भगत व राजेश विचारे यांचा डॉ. मर्दाने यांच्या हस्ते तर सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेणारे किसन ढोले, सोनू जगताप यांचा डॉ. सावंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते आदिवासी शेतकरी जोडप्यांना ऐन हंगामात वैभव विळ्याचे वितरण करण्यात आल्याने त्यांनी आनंद व कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ प्रवीण झगडे यांनी केले व आभार डॉ. रवींद्र मर्दाने यांनी मानले. कार्यक्रमाला सेवानिवृत्त वाहन चालक चंद्रकांत लोखंडे, मनोहर देशमुख, वाहन चालक प्रदीप ठाकूर, संतोष भोईर, विशाल बोरकर आवर्जून उपस्थित होते.

Exit mobile version