तळीयेतील २६ बेघर कुटुंबियांना अंजुमन दर्दमंद कडून संसारोपयोगी वस्तुंचे वाटप

महाड | प्रतिनिधी |

महाड तालुक्यात दि. २१ व २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये तळीये कोंडाळकरवाडी वर दरड कोसळून ८७ लोक गाडली गेली आणि संपुर्ण वाडी बेघर झाली. या ठिकाणी आपल्या नातलगांकडून आश्रीत म्हणून असलेल्या २६ कुटुंबियांना अंजुमन दर्द मंदाने तालीम व तरक्की ट्रस्टच्या वतीने प्रत्येकी १० हजाराचे कुपन देऊन गॅस शेगडी मिक्सर गादी भांड्यांचा सेट अशा संसारोपयोगी वस्तु देऊन आधार देण्याचा प्रयत्न केला.
अंजुमन दर्द मंदाने तालीम व तरक्की ट्रस्ट च्या वतीने महाड शहर व आजुबाजूच्या परिसरातील पूराने बाधित झालेल्या गावांतील १५०० कुटुंबाना १० हजाराचे कुपन देऊन संसारोपयोगी वस्तु इसाने कांबळे येथील फ्री शॉपिंग मॉल मध्ये उपलब्ध करून दिल्या होत्या. या शॉपिंग सेंटरला प्रांताधिकारी पुदलवाड यांनी भेट दिल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष मुफ्ती रफीक पुरकर यांना तळीये तील बेघर कुटुंबांना या कुपनचा लाभ देण्यात यावा अशी सूचना केली होती व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ती मान्य केली होती त्यानुसार आज गुरुवारी तळीयेचे सरपंच प्रकाश तांदळेकर व उपसरपंच महेश म्हस्के यांचे समवेत तळीये कोंडाळकर वाडी येथील २६ कुटुंबियांनी शॉपिंग मॉल मध्ये येऊन आपल्याला आवश्यक असणाऱ्या संसारोपयोगी वस्तु घेतल्या. संस्थेने या कुटुंबियांचे संसार उभे करण्यासाठी केलेल्या प्रयत्ना बद्दल सरपंच तांदलेकर यांनी आभार व्यक्त केले यावेळी अंजुमन दर्द मंदचे पदाधिकारी मौलाना खालीद इसाने, हाफीज मुसद्दीक घोले, हाफीज शकील इसाने, मुफ्ती मुजफ्फर सेन आवाज ग्रुपचे अध्यक्ष दिलदार पुरकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version