। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील नोव्होझाइम्स कंपनीकडून वडगाव ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. सध्या डिजिटल युग असल्याने येथील विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना अडचण येऊ नये, यासाठी लॅपटॉप वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतल्याचे कंपनी व्यवस्थापनाने सांगितले.
नोव्होजाइम्स कंपनीने वडगाव ग्रामपंचायत अंतर्गत ठाकूरवाडी गाव आणि प्राथमिक शाळांमध्ये लॅपटॉप वाटप मोहिमेचे आयोजन केले होते. आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी महत्वाचे पाऊल उचळणारी नोव्होझाइम्स ही पहिली कंपनी असावी, अशी प्रतिक्रिया आदिवासी बांधवांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नोव्होझीम्सचे नूतनीकरण केलेले लॅपटॉप वाटप करण्यात आले. जेणेकरुन विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा आणि शिकण्याचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल. तसेच यावेळी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटपही करण्यात आले. वाटपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, नोव्होझाईम्सचे संचालक संजय सूर आणि व्यवस्थापन टीम आदी उपस्थित होते.