नाण्याचा माळ शाळेला पोर्टेबल खोली
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायतीमधील नाण्याचा माळ या आदिवासी पाड्यांमध्ये राहणार्या विद्यार्थ्यांना तेथील जिल्हा परिषद शाळेची इमारत नसल्याने जागा उपलब्ध नव्हती.शाळेची आणि विद्यार्थ्यांची ही समस्या नवी मुंबई येथील आविष्कार फाऊंडेशन आणि श्री साई ट्रस्टकडून पूर्ण करण्यात आली असून, शाळेसाठी पोर्टेबल खोली भेट देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता झाडाखाली किंवा कोणाच्या खासगी घरी जाऊन शिक्षण घ्यावे लागणार नाही.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका दुर्गम भागातील नाण्याचा माळ या शाळेत गेली दहा वर्ष वर्गखोली नसतानाही शाळा भरवली जात आहे. वनविभागची दली जमीन असल्याकारणाने तेथे शाळेच्या वर्गखोलीचे बांधकाम करता येत नाही आणि त्यामुळे शाळा खासगी जागेत भरविली जात आहे. याबाबत आविष्कार फाऊंडेशन मुंबई आणि श्री साई ट्रस्ट नवी मुंबई यांना तालुक्यातील श्री साई ट्रस्टचे काम पाहणारे माणगाव वरेडी शाळा मुख्याध्यापक दिलीप घुले यांच्याकडून प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार या दोन्ही संस्था यांनी शालेय विद्यार्थ्यांचे गैरसोय दूर करण्यासाठी बसण्याची व्यवस्था करण्यासाठी एक स्तुत्य उपक्रम राबविला. त्यात पोर्टेबल वर्ग खोली उपलब्ध करून दिली असून, नाण्याचा माळ येथील शालेय विद्यार्थ्यांना हक्काचं अध्यापन स्थान मिळवून दिले.
या कामासाठी अविष्कार फाऊंडेशनचे डॉ. निर्मला राव श्री साई ट्रस्टच्या राधिका घुले यांनी विशेष सहकार्य केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रुपेश मोरे शिक्षक सोनवणे तसेच शालेय व्यवस्थापन समिती नाण्याचा माळ येथील पदाधिकारी उपस्थित होते.