| खोपोली | वार्ताहर |
एक हात मदतीचा, चला आपणसुद्धा मदत करू या… याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ गेले अनेक वर्षे सामाजिक उपक्रम राबवित आहेत. संस्थेचे अध्यक्ष कमलाकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी खालापूर तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीच्या रानसई आदिवासी वाडीतील अंगणवाडी मुलांसह सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना दप्तरे, कंपास, वह्या, पाटी, पेन्सिल तसेच महिलांना साड्या व प्रत्येक घरात चादर, ब्लँकेट अशा वस्तुंचे वाटप करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे काम हे ऐरोली शहरातून सुरू आहे. या मंडळाचे अनेक सभासद आहेत. आपल्या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी ऐरोली येथे सिडकोच्या माध्यमातून भूखंड घेऊन समाजभुवन तसेच आई तुळजाभवानीचे भव्य मंदिर उभारले आहे. या सेवा संघातील सभासदांनी आपल्याजवळील पैसे एकत्र करून आदिवासी समाजातील गरजवंतांची गरज भागविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या माध्यमातून खालापूर तालुक्यातील रानसई आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांना जवळपास दोन लाख रूपये किमतीच्या वस्तुंचे वाटप केले. यावेळी शिरवली ग्राम पंचायतीचे माजी सदस्य बोडेकर, संजित भोसले, मिलिंद चव्हाण, मनिष भोसले आदी स्थानिक कार्यकर्त्यांसह संस्थेचे 80 सदस्य उपस्थित होते.