स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप

श्रीवर्धन नगरपरिषदेचा कौतुकास्पद उपक्रम

। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।

भारत सरकारच्या NAMASTE (यांत्रिक स्वच्छता परिसंस्थेसाठी राष्ट्रीय कृती) अभियानांतर्गत श्रीवर्धन नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी ‘पीपीई किट’ (PPE Kit) वाटप करण्यात आले. हा विशेष कार्यक्रम शनिवारी (दि.25) पार पडला. याप्रसंगी श्रीवर्धन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अतुल चौगुले, उपनगराध्यक्ष अनंत गुरव आणि मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना मान्यवरांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव केला. नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी हे शहराचे खरे ‘आरोग्य रक्षक’ आहेत. त्यांच्या सुरक्षिततेची आणि आरोग्याची काळजी घेणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. तसेच, दैनंदिन काम करताना स्वतःच्या संरक्षणासाठी या सुरक्षा साधनांचा नियमित वापर करण्याचे आवाहनही कर्मचाऱ्यांना करण्यात आले.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीपीई किट प्रदान करण्यात आले. नगरपरिषदेने या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.या कार्यक्रमास नगरपरिषदेचे अभियंता , कर्मचारी व स्वच्छता दलातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version