पतसंस्थेकडून शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप
| आगरदांडा/मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |
आज समाजाला सामाजिक हित जपणाऱ्या पतसंस्थेची आवश्यकता आहे. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, ही उदांत भूमिका घेऊन कार्य करणाऱ्या पतसंस्था आजही कार्यरत आहेत. आर्थिक क्षेत्रात काम करत असतानादेखील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था ही खऱ्या अर्थाने जनसामान्यांचे हित पाहणारी पतसंस्था असल्याचा मला सार्थ अभिमान वाटत आहे, असे प्रतिपादन मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी केले आहे. कार्यक्रम प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
यावेळी मुरुड शहरातील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेकडून मुरुड नगरपरिषदेच्या सहा मराठी शाळेतील सुमारे 300 विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथीमधील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप केले. इयत्ता पाचवी ते सातवी कॅमलिन कंपास बॉक्सचे (100 बॉक्स) वाटप करण्यात आले. तर नगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व सहा शाळांना ग्रीन बोर्ड वाटप करण्यात आले.







